मुंबई (वृत्तसंस्था) – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री DC अनिल कुमार लाहोटी यांनी टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मध्य रेल्वेच्या ऑलिम्पिक महिला हॉकी खेळाडूंचा सत्कार केला.

सुश्री वंदना कटारिया, सुश्री मोनिका मलिक, सुश्री सुशीला चानू पुखराम्बम आणि सुश्री रजनी एतिमारपू यांनी नुकत्याच टोकियो येथे संपन्न झालेल्या ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले. श्री अनिल कुमार लाहोटी यांनी यावेळी संबोधित करताना सांगितले की, मध्य रेल्वेच्या चार खेळाडूंचा सत्कार करताना अत्यंत आनंद होत आहे. ते म्हणाले की, मध्य रेल्वे सर्वसाधारणपणे खेळांना आणि विशेषत: हॉकीला प्रोत्साहन देत राहील जेणेकरून खेळाडूं देशाला गौरवान्वित करतील. क्रीडा मैदाने आणि खेळाडूंच्या सुविधाना प्राधान्य दिले जाते शिवाय प्रशिक्षक पुरवले जातील जेणेकरून खेळाडू भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होतील.
मुंबई विभागात काम करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करताना महाव्यवस्थापक म्हणाले की, मध्य रेल्वेला महिला हॉकीपटूंनी ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल अभिमान आहे. त्यांनी सुश्री वंदना कटारिया यांचे अभिनंदन केले, त्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये हॅटट्रिक करणारी पहिली भारतीय महिला ठरल्या. कशाचीही पर्वा न करता हॉकी खेळण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप चांगले प्रोत्साहन दिले जात असल्याबद्दल खेळाडूंनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.
श्री बी. के. दादाभॉय, अतिरिक्त महाव्यवस्थापक, श्री मनोज शर्मा, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) आणि अध्यक्ष, मध्य रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन (CRSA), आणि मध्य रेल्वेचे सर्व विभाग प्रमुख तथा श्री शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग आणि मान्यताप्राप्त कामगार संघटनाचे पदाधिकारी, खेळाडू आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मध्य रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनचे सरचिटणीस श्री डी जे सेनगुप्ता यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी सर्व कोविड -19 शी संबंधित अनिवार्य प्रोटोकॉल पाळण्यात आले.







