मुंबई ( प्रतिनिधी ) – मंदाकिनी खडसे यांना उच्च न्यायालयाने ईडीच्या हजेरीपासून मुभा दिली आहे. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांना आता ईडी कार्यलयात जायची गरज नाही. अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने आज हा निर्णय दिला आहे.
पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. त्याविरोधात मंदाकिनी खडसे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला होता. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये मंदाकिनी खडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. या कालावधीत त्यांनी ईडीला तपासकार्यात सहकार्य करावे असे निर्देश कोर्टाने दिले होते.