महावितरणची वीज ग्राहकांकडे सुमारे २५० कोटी रुपयांची थकबाकी
जळगाव (प्रतिनिधी) :- महावितरणच्या जळगाव परिमंडलातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात कृषी ग्राहक वगळता घरगुती, वाणिज्यक, औद्योगीक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे सुमारे २५० कोटी रुपयांची थकबाकी थकली आहे. चालू वीज बिलांसह थकबाकी वसुलीला प्राधान्य दिले जात असतांना काही ठिकाणी वसुली करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व आरेरावीच्या दुर्देवी घटना घडतांना आढळून येत आहे. वसुलीसाठी आवश्यकतेनुसार स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेऊन वीजबिल वसुली करण्यात यावी, अशा सुचना महावितरणकडून क्षेत्रिय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
घरगुती, वाणिज्यक, औद्योगिक आणि इतर वर्गवारितील ग्राहकांकडे महावितरणचे जळगावमध्ये १४१ कोटी, धुळ्यात ७६. ११ कोटी तर नंदुरबार जिल्ह्यात ३१. ५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. चालू वीज बिलांच्या रक्कमा वेगळ्या आहेत. त्याच्या वसुलीसाठी महावितरणकडून प्राधान्य देण्यात येत आहे. वीजग्राहकांनीही महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन किंवा गुगल पे, फोन पे, नजिकचे महाईसेवा केंद्र, वॉलेट, महावितरण ॲप व इतर ऑनलाईन माध्यमातून वीजबिल भरुन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
महावितरण ही सरकारी वीजवितरण कंपनी आहे. बहुतांशी ठिकाणी काही ग्राहकांकडून विजेची नियमितपणे बिले भरली जात नसल्याने ग्राहकांकडे थकबाकी वाढली आहे. वसुलीसाठी नाईलाजाने थकबाकीदारांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्यात येत आहे. तशा कारवाईसाठी आवश्यकतेनुसार स्थानिक पोलिसांचे सहकार्य व संरक्षण घेण्याच्या सुचना महावितरणचे मुख्य अभियंता श्री आय.ए.मुलाणी यांनी जळगाव परिमंडलातील क्षेत्रिय अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
वापरलेल्या विजेच्या बिलांच्या वसुलीसाठी कारवाई सुरु असतांना काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना दमदाटी व मारहाणीच्या घटना घडत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून तशा प्रकरणात पोलीसांत गुन्हे दाखल करण्याच्या सुचनाही महावितरणच्या वरिष्ठांनी दिलेल्या आहेत. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार मारहाण करणाऱ्यांना दोन ते दहा वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासासह आर्थिक दंडाची तरतूद आहे.