देवगिरी बँक फसवणूक प्रकरणी अटकेसाठी मुंबईहून पथक चाळीसगावला रवाना ; सुत्राची माहिती ?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खळबळ
चाळीसगाव (विशेष प्रतिनिधी) – माजी खासदार तथा शिवसेना (ठाकरे गट) नेते उन्मेष पाटील यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेतील तब्बल ५ कोटी ३३ लाख ८५ हजार ३५६ रुपयांच्या फसवणूक प्रकरणी त्यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यासाठी मुंबईहून विशेष पथक चाळीसगावला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने देवगिरी बँकेकडून औद्योगिक कर्ज घेण्यात आले होते. हे कर्ज थकीत झाल्याने ते एनपीए झाले.बँकेने वारंवार संधी देऊनही कर्जाची परतफेड झाली नाही. त्यामुळे बँकेने कायदेशीर कार्यवाही सुरू केली. या कर्जापोटी बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी कंपनीच्या संचालकांनी संगनमताने बँकेला कोणतीही कल्पना न देता विकून टाकल्याचा गंभीर आरोप आहे. हा प्रकार फसवणुकीच्या श्रेणीत मोडत असल्याने बँकेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात माजी खासदार उन्मेष पाटील, तसेच संजय धनकवडे, प्रशांत वाघ, आणि प्रमोद जाधव यांच्याविरोधात फसवणुकीसह भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगर परिषद/नगरपालिका) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई होत असल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाला आव्हान देणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या उन्मेष पाटील यांच्यावरील या कारवाईमुळे आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.








