पैसे घेऊन २ बहिणींशी लग्न लावले, दोघीही दागिने-पैसे घेऊन पसार
जळगाव (प्रतिनिधी): लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या दोन मित्रांना लग्नाच्या आमिषाने लाखो रुपयांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. मध्यस्थ महिलेच्या मदतीने सख्ख्या बहिणींशी लग्न लावून, काही दिवसांतच त्या नववधू दागिने आणि पैसे घेऊन माहेरी पसार झाल्या आहेत. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सितासोनू नगरातील लक्ष्मण राजेंद्र भदाणे (वय २८) आणि त्यांचा मित्र गणेश नथ्थू काथार हे दोघे लग्नासाठी मुलगी शोधत होते. त्यांच्याच कॉलनीजवळ राहणाऱ्या मनिषा संजय जैन या महिलेने पालघर येथील दोन मुलींची स्थळे सुचवली. मुलीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख ७० हजार रुपये द्यावे लागतील, असे यावेळी ठरले होते.
दोन टप्प्यात झाले लग्न
१. पहिले लग्न: २७ नोव्हेंबर रोजी मनिषा जैन हिने कविता कन्हैयालाल पटेल हिच्यासह तिचे आई-वडील, बहीण सविता आणि इतर नातेवाईकांना जळगावात आणले. लक्ष्मण यांना मुलगी पसंत पडल्याने त्याच दिवशी विवाह झाला आणि १ लाख ७० हजार रुपये मुलीच्या कुटुंबीयांना देण्यात आले. २. दुसरे लग्न: लक्ष्मण यांचा मित्र गणेश काथार याचे लग्न कविताची बहीण सविता पटेल हिच्याशी २६ डिसेंबर रोजी लावून देण्यात आले. यासाठी देखील गणेशने १ लाख ७० हजार रुपये मोजले.
पालघर आणि गुजरातमध्ये नेऊन दिली धमकी
लग्नानंतर कविताच्या आई-वडिलांनी तिला काही दिवसांसाठी पालघरला नेले. ३ जानेवारी रोजी लक्ष्मण आणि गणेश आपल्या पत्नींना परत आणण्यासाठी पालघरला गेले असता, तिथे सासरच्यांनी विनाकारण वाद घातला. त्यानंतर त्यांना गुजरात मधील वाघाबारी फडवेल रोड येथील एका शेतात नेले. तिथे मुलीच्या आई-वडिलांनी आणि आत्याने दोन्ही तरुणांना “पुन्हा इथे आलात तर जिवंत ठेवणार नाही” अशी जीवे मारण्याची धमकी देऊन हाकलून दिले.
दोन्ही नववधू परत येत नसल्याने आणि मध्यस्थ मनिषा जैन हिनेही उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री तरुणांना झाली. अखेर त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मध्यस्थ मनिषा संजय जैन (रा. राजाराम नगर), नववधू कविता पटेल, सविता पटेल, त्यांचे कथित आई-वडील, आत्या पुनम वर्मा आणि राणीताई किन्नर (सर्व रा. पालघर) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.









