अमळनेर तालुक्यातील लोण तांडा येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील लोण तांडा येथे शॉर्टसर्किटने आग लागून शेतकऱ्याच्या शेतातील गव्हाचे पीक, चारा व ठिबक नळ्या असे सुमारे सव्वा लाखाचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना दि. ११ रोजी दुपारी १२ वाजता घडली. अमळनेर पोलिसांत आगीची नोंद करण्यात आली आहे.
लोण तांडा येथील पोलिस पाटील अनिल महारु राठोड यांच्या गट नबंर ४६/ १ व ४६/२ या शेत शिवारात असलेल्या विद्युत खांबावर शॉर्टसर्किट झाल्याने शेतात कापून ठेवलेल्या ६० हजाराचे गव्हाचे पीक, ३० हजाराच्या ठिबक नळ्या, १० पाईप तसेच शेजारील बापू आसाराम पाटील यांच्या शेतातील ३० हजाराचा चारा असा एकूण १ लाख २० हजारांचे साहित्य जळून खाक झाले. अमळनेर येथून नगर परिषदेचा अग्निशमन बंब मागवला होता. फायरमन दिनेश बिऱ्हाडे, चालक जाफर पठाण, भिका संदानशिव यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. याबाबत अमळनेर पोलिसांत आगीची नोंद करण्यात आली असून तपास हे.कॉ. दिनेश पाटील करत आहेत.