प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाचा चेहरा तरुण असण्याची शक्यता आहे. त्याबाबत पक्षाची निवडणूक समिती निर्णय घेईल. मात्र लोकसभेसाठी पक्षाची चाचपणी सुरु असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पक्षात कुठेही गटतट नाही. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते एकदिलाने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन पक्षाच्या उमेदवाराला विजयी करतील, असेही त्यांनी सांगितले.
सध्या महाविकास आघाडीची लोकसभा उमेदवारांची संभाव्य यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याप्रकरणी सर्वत्र चर्चा व वाद सुरु आहे. या प्रकरणी मात्र काँग्रेस पक्षातर्फे दावेदार असलेले माजी खासदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल यादीत जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा हि गुलाबराव देवकर व रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा हि एकनाथराव खडसे यांना देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे आहे. मात्र रावेर लोकसभेवर काँग्रेस पक्षाचा दावा आजही आहे.
या घडामोडीवर डॉ. उल्हास पाटील यांनी भाष्य केले. रावेर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. काँग्रेस विचारधारेचे मतदार येथे आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना देखील याबाबत कल्पना आहे. भाजपाला हरवायचे हा उद्देश महाविकास आघाडीचा आहे. त्यामुळे घटक पक्ष हे त्यांची ताकद काँग्रेस पक्षाच्या पाठीशी लावणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.