महाराष्ट्रात लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. साधारण गेल्या महिन्याभरापासून लॉकडाऊनअंतर्गत लागू असलेले कडक निर्बंध आता 1 जून सकाळी सात वाजेपर्यंत कायम राहणार आहेत.
राज्य सरकारने यासंदर्भातील आदेश जारी केलाय. त्यामुळे संचारबंदीसह लागू असलेले सर्व नियम लागू असतील. केवळ अत्यावश्यक सेवा आणि योग्य कारण असल्यास घराबाहेर पडण्याची परवानगी असणार आहे.
सरकारने जाहीर केलेल्या परिपत्रकात काही नवीन नियमांचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्हानिहाय लॉकडाऊन
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडकडीत लॉकडाऊन देखील घोषित करण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यात पुढील सात दिवस कडकडीत बंदचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. किराणा मालाच्या दुकानांसह भाजीपाला, फळ विक्रेत्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. केवळ मेडिकल आणि हॉस्पिटल्स सुरू राहणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे
बुलडाणा जिल्ह्यातही 20 मेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ठिकठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी होत असल्याचं दिसून येत होतं. यापार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात जिल्ह्यांतर्गत एसटी वाहतूक सेवाही बंद राहणार आहे.
सांगली जिल्ह्यात 5 मेपासून पुढील आठ दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढती रुग्णसंख्या आणि ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा लक्षात घेता साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पालकमंत्री उदय सामंत यांनी सहा दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. मेडिकल आणि हॉस्पिटल वगळता सर्व आस्थापनं आणि दुकानं बंद राहणार आहेत.
सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद अशा जिल्ह्यांमध्येही जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाबंदीसह लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहेत.