लखनौ – लव्ह जिहादच्या प्रयत्नांतून उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होत असल्याच्या घटना घडत असून त्या रोखण्यासाठी योगी सरकारने अधिकाऱ्यांना त्या अनुषंगाने उपाययोजना करण्यास सांगितले असून गरज भासल्यास त्या अनुषंगाने अध्यादेशही जारी करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.
मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी विवाह करायचा आणि त्यांचे सक्तीने धर्मांतर करायचे, नंतर त्यांचा क्रूर छळ करायचा किंवा अगदी त्या मुलींची हत्याही करायची असे प्रकार उत्तर प्रदेशात घडत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यावर ठोस उपाययोजना करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे, अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने दिली.
काही ठिकाणी हा प्रकार संघटितपणे सुरू असल्याची सरकारची धारणा झाली आहे. कानपूर पोलिसांनी असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथकच स्थापन केले आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेश विधी आयोगाने सरकारला एक अहवाल सादर केला होता. त्यात त्यांनी सरकारला या अनुषंगाने नवीन कायदाही आणण्याची सूचना केली आहे.
या कायद्याचा मसुदाही विधी आयोगाने सादर केला आहे. अशा पद्धतीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी सध्याचे कायदे अपुरे आहेत असा अभिप्रायही विधी आयोगाच्या अहवालात देण्यात आला आहे.