जिल्हा परिषदेची सोमवारी ऑनलाईन सर्वसाधारण सभा
जळगाव (प्रतिनिधी) – औषधे, वैद्यकीय उपकरणे खरेदी करणे, ग्रामीण पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करणे तसेच अर्थसंकल्पातील विविध तरतुदीवर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार असून या विषयांवर विरोधक सत्ताधा-यांना धारेवर धरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी २८ सप्टेंबर सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सभेसाठी विषयपत्रिकेत १६ विषय आहेत. यात प्रामुख्याने २०२०-२०२१ स्वउत्पन्नाच्या व खर्चाचा अर्थसंकल्पासह सेस फंड अंतर्गत संसर्ग आजारावर निधी पुर्ननियोजनाने निधीची मागणी करण्यावर चर्चा होणार आहे. यासह ग्रामीण पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, सातवा वेतन आयोग लागू करणे तसेच विषय समित्या व पंचायत समित्या यांच्या शिफारशीनुसार वार्षीक प्रशासकीय अहवालाच्या मंजूरीवर चर्चा रंगणार आहे.
कोरोना संसर्गजन्यस्थितीमुळे ही सभा मागील प्रमाणे ऑनलाईन घेतली जाणार आहे. सद्या कोरोना संसर्ग कायम असून यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सेस फंडा अंतर्गत औषधे, अत्यावश्यक वैदकीय उपकरणे खरेदीस मुभा आहे. त्यानुसार यासाठी निधीची मागणीही यावेळी होणार आहे. यात प्राथमिक आरोग्य जीवनावश्यक औषधी साहित्य खरेदीसाठी २१ लाख ५० हजार, १८ आयुर्वेदीक दवाखान्यातील औषधीसाठी ४७ लाख, स्वीपर कर्मचारी गणवेश २ लाख, तसेच वकील फी, योजना परीचलन यासाठी १ लाख रुपये अशा एकूण ७१ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पातील तरतूदीचा प्रस्ताव सभेत मांडला जाणार आहे. यासह अंगणवाडी, जीर्ण शाळा खोल्या निर्लेख, हायमास्ट लॅम्प निविदा मंजूर करणे हे विषय असणार आहे. यासह पंधराव्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीचे पंचायत समितीसह जिल्हा परिषद सदस्यांना समान वितरणाचा विषयही चांगलाच गाजणार असल्याचे दिसत आहे.