केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे ब्रँड ॲम्बेसेडर
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही सरदार वल्लभभाई पटेल चषक स्पर्धेचे आयोजन दि. १४ ते १९ जानेवारी दरम्यान सागर पार्क मैदानात आयोजित करण्यात आले आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी ९ सामने होणार असून संध्याकाळी उद्घाटन होणार आहे.
लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचे हे सहावे पर्व आहे. स्पर्धेसाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री रक्षाताई खडसे या ब्रँड अँबेसिडर आहेत. स्पर्धेचे संध्याकाळी ७ वाजता शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, माजी महापौर ललित कोल्हे, सुवर्ण उद्योजक भागवत भंगाळे, सुनील सरोदे, हर्षल ढाके, डॉ. अनंत पाटील, चेतन पाटील, दीपक पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेला मंगळवारी दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता मोरया कन्स्ट्रक्शन आणि ओम बिल्ड चॅम्प या संघांमधील सामन्याने सुरुवात होणार आहे. त्यानंतर भूमी वॉरियर्स आणि लीड्सकेम्स यांच्यात सामना होईल. स्पर्धेमध्ये २४ संघ सहभागी होत असून यंदा प्रथमच जिल्ह्यातील ग्रामीण भागातून प्रतिनिधित्व करणारे संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक खेळाडूला क्रीडा साहित्य मोफत देण्यात येणार आहे. तरी खेळाचा आनंद लुटण्यासाठी आणि खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी समाज बांधवांनी सागर पार्क मैदानावर उपस्थिती द्यावी, असे आवाहन लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.