मधमाशांचा हल्ला टाळण्यासाठी अजिंठा, वेरुळ लेणीच्या पर्यटकांना सूचना
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी जाणार्या पर्यटकांना मधमाशांच्या पोळ्यापासून सावध राहण्याचे आवाहन भारतीय पुरातत्त्व विभागाने केले आहे. तेथे जाताना उग्र वासाचे परफ्यूम, लाल रंगाचे कपडे टाळण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत. यापूर्वी पर्यटकांवर मधमाश्यांनि हल्ला केला असल्यामुळे सतर्क म्हणून इशारा दिला आहे. लेणींच्या परिसरातील मधमाशा हल्ला करण्याची शक्यता जास्त आहे.
काही दिवसांपूर्वी अजिंठा लेणीत मधमाशांनी २० पर्यटक व ६ कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्याआधी ९ एप्रिल रोजी वेरूळ येथे १६ क्रमांकाची कैलास लेणी पाहताना १६ पर्यटकांवर आग्यामोहोळाच्या माशांनी हल्ला केला होता. दहा वर्षांपूर्वी लेणी क्रमांक २९ व १६ मध्ये मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात विदेशी पर्यटक गंभीर जखमी झाले होते. त्यापूर्वी २००७ मध्येही आग्यामोहोळाने पर्यटकांवर हल्ला चढवल्याची घटना समोर आली होती.
वेरूळ लेणी आणि अजिंठा लेणीत मोठ्या प्रमाणात मोहोळ आहेत. या मधमाशांना आपली पोळी थंड ठेवण्यासाठी थंड हवेची गरज असते. सध्या वाढलेली उष्णता त्यांना सहन होणारी नाही. त्यात मिथिलिन क्लोराइड, फेरॉन यांचा वापर केलेले उग्र गंधाचे परफ्यूम आणि लाल रंगामुळे मधमाशा चिडतात. ३४° सेल्सिअसपेक्षा तापमान अधिक झाल्यास परफ्यूमचा वास अधिक उग्र होतो आणि माशा आक्रमक होतात. मानवांची श्वासनलिका मोठी असल्याने त्यांना हा वास सहन होणारा असला तरी तो मधमाशांना सहन होत नाही. गुटखा, सिगारेटचा धूर याचाही त्यांना राग येतो. त्यांना लाल रंगाचाही राग असल्याने त्या हल्ला चढवतात. त्यामुळे पर्यटनादरम्यान या सर्व गोष्टी टाळाव्यात असे तज्ज्ञांचे मत आहे.
हे हल्ले टाळण्यासाठी प्रशासनाकडून सुटीच्या दिवशी धूर करून लेणीतले मोहोळ हटवण्याचे प्रयत्न केले जातात. परंतु मधमाशा काही काळासाठी उठून दुसर्या ठिकाणी जाऊन बसतात त्यामुळे मोहोळ पूर्णपणे हटवणे कठीण होते. त्यामुळे सुटीच्या दिवशी दोन्ही लेण्यांमध्ये धूर करुन मोहोळ हटवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत.