लातूर ( वृत्तसंस्था ) – लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले .यात काळेबेरे असावे अशी शंका या नेत्यांनी उपस्थित करीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले आहे.
राज्यपालांना भेटलेल्या भाजपच्या शिष्टमंडळामध्ये आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार अभिमन्यु पवार यांचाही समावेश होता. शुक्रवारी मुंबईत राजभवनावर या शिष्टमंडळाने भेट देऊन राज्यपालांकडे निवेदन सादर केले.
या निवेदनात भाजपच्या शिष्टमंडळाने म्हटले आहे की, निवडणूक निर्णय अधिकारी आणि अन्य लोकांनी अधिकाराचा गैरवापर करून आमचे अर्ज बाद करण्याचा चुकीचा निर्णय घेतला आहे. संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. विरोधकांचे उमेदवारी अर्जच बाद करून कॉंग्रेसने या बॅंकेवरील लोकशाही प्रक्रियेचीच हत्या केली आहे असे त्यांचे म्हणणे आहे.