यावलचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात
जळगाव (प्रतिनिधी):- लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वनविभागातील कर्मचाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी यावल येथील वनरक्षक भैय्यासाहेब भीमराव गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे यावल परिसरातील असून ते बोलेरो पिकअप वाहनांद्वारे लाकूड वाहतुकीचा व्यवसाय करतात. ही वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आणि कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी वनरक्षक भैय्यासाहेब गायकवाड यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने या मागणीबाबत २० मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार नोंदवली होती. एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता, गायकवाड यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती ९ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते.
कारवाईदरम्यान आरोपीला संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम प्रत्यक्ष स्वीकारली नाही. मात्र, लाच मागितल्याचा ठोस पुरावा मिळाल्याने एसीबीने गायकवाड यांच्याविरुद्ध फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे, बाळू मराठे, राकेश दुसाने आणि सुरेश पाटील यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करत आहेत. वनविभागातील या कारवाईमुळे लाचखोरांमध्ये खळबळ उडाली असून, अशा प्रकारांवर अंकुश बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









