जळगावात पोलीस स्टेशनशेजारी घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : एका वृद्ध महिलेला तुमच्या गळ्याला काहीतरी लागले आहे असे सांगून एका भामट्याने ते मी काढून देतो म्हणत वृद्धेच्या गळ्यातून सव्वा लाखाची सोन्याची चैन लांबवली. ही घटना ६ फेब्रुवारी रोजी हॉटेल प्रेसिडेंटमध्ये घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नागेश्वर कॉलनीतील हेमंत न्याती यांच्या नातेवाईकांकडे लग्न असल्याने ते कुटुंबासह हॉटेल प्रेसिडेंट येथे गेले होते. तेथे त्यांच्या आई पुष्पाबाई न्याती यांना त्रास होऊ लागल्याने त्यांची देखभाल करणाऱ्या केअरटेकर महिलेसोबत खोलीत गेल्या. त्यांच्या सोबतची महिला बाजूला जाताच तेथे एक जण आला.
‘तुमच्या गळ्याला काही तरी लागले आहे, मी काढून देतो’, असे म्हणत त्याने वृद्धेच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किमतीची २१ ग्रॅमची सोन्याची चैन ओढून नेली. या प्रकरणी हेमंत न्याती यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चैन ओढणारा संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी ते सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून संशयिताचा शोध घेतला जात आहे.