मुंबई ( वृत्तसेवा ) – “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने”चे डिसेंबर महिन्यातील पैसे वितरण होण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हप्ता मिळणार की नाही याबाबत अफवा पसरत होत्या, महिलांनाही हप्ता कधी मिळेल याची उत्सुकता होती. मंगळवारी दि. २४ महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केले होते. अधिवेशन संपल्यावर बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता टाकला जाईल हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य खरे ठरले आहे. जळगाव जिल्ह्यातील काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. दोन महिन्यांचे एकाचवेळी पैसे जमा होतील असे सांगण्यात येत होते, परंतु केवळ डिसेंबर महिन्यातीलच पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. पुढील काही दिवसांमध्ये सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.