विश्लेषण : भुसावळ विधानसभा मतदारसंघ
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- भुसावळ विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीमधील भाजपचे आ. संजय सावकारे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. राजेश मानवतकर यांच्यामध्ये प्रमुख लढत बघायला मिळत आहे. ही लढत दिसायला एकतर्फी असली तरी जनतेच्या मनात नेमके काय याबाबत राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता आहे.
आ. संजय सावकारे हे चौथ्यांदा निवडणूक लढवीत असून मागील तीनही टर्ममध्ये ते विजयी झाले आहेत. २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजय झाल्यानंतर २०१४ व २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यातही ते विजयी ठरले. आता ते पुन्हा भाजपाकडूनच उमेदवारी करीत आहेत. दुसरीकडे मागील पंचवार्षिकला २०१९ साली अपक्ष उमेदवार डॉ. मधु राजेश मानवतकर यांनी त्यांना लढत देण्याचा प्रयत्न केला होता. यंदा डॉ मधु मानवतकर यांचे पती डॉ. राजेश मानवतकर हे संजय सावकारे यांच्यासमोर लढत देत आहेत.
भुसावळ विधानसभा मतदारसंघात ३ लाख १६ हजार ३०० मतदार असून पुरुष १ लाख ६१ हजार ८३९, महिला १ लाख ५४ हजार ४२५ तर तृतीयपंथी ४० मतदार आहेत. मागील वर्षी २०१९ साली संजय सावकारे यांना ८१ हजार ६८९ तर डॉ. मधु मानवतकर या अपक्ष उमेदवारांना २८ हजार ६७५ मते मिळाली होती. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीतर्फे जगन सोनवणे यांनाही उमेदवारी मिळाली असून मागील वेळी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. त्यांना २० हजार २४५ मते मिळाली होती.