जळगाव (प्रतिनिधी) :- नवीन बांधलेल्या घरासाठी वीज मीटर बसवण्यापूर्वी दिलेली दंडाची रक्कम भरावी, त्यानंतरच मीटर मिळेल असा निरोप दिल्यानंतर कंत्राटी वायरमन याने प्रकरण मिटवण्यासाठी १ लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी ९ जानेवारी रोजी रात्री १० वाजता सापळा रचून अटक केली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत विकास जगताप (वय-३३, रा. जळगाव) असे अटक केलेल्या कंत्राटी वायरमनचे नाव आहे.
यासंदर्भात माहिती अशी की, जळगाव शहरातील तक्रारदार यांनी घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण केले आहे. घराला वीज मीटर बसण्यासाठी त्यांनी यापूर्वीच महावितरणकडे अर्ज केला होता. परंतु त्यांना मीटर बसवले नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराला महावितरण कंपनीच्या पथकाने भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांना ४ लाख ६० हजार रुपयांची दंडाची रक्कम भरली, तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल असा निरोप कंत्राटी वायरमन दिला होता. त्यानुसार तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली. हे प्रकरण १ लाख ६० हजार रुपयांमध्ये मिटवतो असे सांगून कंत्राटी वायरमन याने लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार पथकाने मंगळवारी ९ जानेवारी रोजी रात्री १० वाजता सापळा रचला. त्यावेळी १ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना कंत्राटी वायरमनला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महावितरण कंपनीत मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.