जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीक योगेश खोडपे याला शिक्षकाच्या पदमान्यतेसाठी दोन लाख ३० हजार रुपये लाचेची मागणी केली म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आज अटक केल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांचा लहान भाऊ शहरातील आर.आर.विद्यालय येथे सन-2014 पासुन शिक्षक पदावर विनाअनुदानीत तत्वावर नोकरीस आहेत त्यांच्या विनाअनुदानीत तत्वावरुन अनुदानित तत्वावर शिक्षणसेवक पदी नियुक्तीस मान्यता मिळावी म्हणून अनुकूल अहवाल तयार करून पाठविण्याच्या मोबदल्यात योगेश खोडपे ( रा.ममता राणे नगर,वाघ नगर,जळगांव ) याने तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 2,30,000/-रुपये लाचेची मागणी केली म्हणुन त्यांचेविरुध्द आज जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपीने आधी १२ फेब्रुवारी २०२१ रोजी या रकमेची मागणी तक्रारदाराकडे केली होती .
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यानुसार सापळा रचून आज योगेश खोडपेला रंगेहात अटक करण्यात आली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे नाशिकचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, प्रभारी अपर अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील, पो नि संजोग बच्छाव, स.फौ दिनेशसिंग पाटील, स.फौ सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्धन चौधरी, कॉ प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ आदींच्या पथकाने केली. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.