जळगाव एसीबीची एरंडोल तालुक्यात कारवाई
एरंडोल (प्रतिनिधी) :- पत्नीचे मेडिकल बिल मंजूर करवून घेण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या निपाणेतील हरिहर माध्यमिक हायस्कूलमधील मुख्याध्यापक संदिप प्रभाकर महाजन याला ३ हजार ६०० रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. याप्रकरणी कासोदा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शाळेतील एका कर्मचाऱ्याच्या पत्नीचे २३ हजार ८१५ रूपयांचे वैद्यकीय बिल होते. हे बिल मंजूर होण्यासाठी या कर्मचाऱ्याने महाजन यांच्याकडे ते सादर केले होते. हे बिल आपण आपल्या ओळखीने जिल्हा रुग्णालय व वेतन अधिक्षक, माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडून मंजूर करवून घेतो, असे आश्वासन महाजन याने दिले होते. यासाठी महाजन याने सुरूवातीला ५ हजार रूपये लाच मागितली होती. मात्र तडजोड करून ३ हजार ६०० रूपये एवढी रक्कम देण्याचे ठरले. दरम्यान, या कर्मचाऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार संदीप महाजन याच्यावर कारवाइ करण्यात आली.
याबाबत कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याध्यापक महाजन याने यापूर्वी याच कर्मचाऱ्याकडून वेतन निश्चितीच्या फरकाची २ लाख ५३ हजार ७८० रूपये एवढी रक्कम मिळवून देण्यासाठी १२ हजार ५०० रूपये लाच मागितली होती. तडजोडअंती १० हजार रूपये लाच स्विकारली होती. या प्रकरणातही महाजन याच्यावर २७ जून २०२४ रोजी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाइ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ सुरेश पाटील, पोहेकों किशोर महाजन, पो. ना. बाळू मराठे, पोकों प्रदीप पोळ यांच्या पथकाने केली.