जळगावात ६८ हजारांचा मुद्देमाल लांबविला
जळगाव (प्रतिनिधी) : बाहेरगावी फिरण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याच्या घरी चोरटयांनी घरफोडी केल्याची घटना १ जून ते ६ जून दरम्यान शहरातील चंद्रप्रभा कॉलनी येथे घडली. या प्रकरणी दि. ७ जून रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पराग विद्यासागर जोगळेकर (४६, रा. चंद्रप्रभा कॉलनी, जळगाव) हे फिर्यादी आहे. मूळ चाळीसगाव येथील रहिवासी असलेले पराग जोगळेकर हे एका खासगी बँकेच्या जळगाव शाखेत नोकरीला आहे. दि. १ जून रोजी ते पत्नी व मुलासह हैदराबाद येथे फिरण्यासाठी तसेच मुलाचे डोळे तपासण्यासाठी गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी संधी साधून दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. तसेच घरातून रोख १७ हजार रुपये, सोन्याचे दागिने लॅपटॉप व इतर साहित्य असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
जोगळेकर यांना शेजारील रहिवाशांनी, तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे. त्या वेळी ते घरी परतले असता घरात चोरी झाल्याचे समजले. या प्रकरणी जोगळेकर यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि दादाराव वाघ करीत आहेत.