प्रचंड त्रुटी आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील जळगाव महानगरपालिकेतर्फे शहरातील कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी नवसमाज निर्माण बहुउदेशिय संस्था, नंदुरबार यांना मक्ता देण्यात आला आहे. मात्र या संस्थेने हलगर्जीपणा करीत कुत्र्यांचे हाल केल्याचे सरकारी पाहणीत आढळून आले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ.अनिल शिंदे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. महानगरपालिकामार्फत नियुक्त नवसमाज निर्माण बहुउदेशिय संस्था, नंदुरबार यांच्या कामकाजाच्या चौकशीबाबत जिल्हाधिकारी, जळगाव व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांना संस्थेच्या विरोधात प्राण्यांना कुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अर्ज प्राप्त झाला होता. संस्थेचे प्रोजेक्ट डायरेक्टर गौतम अनिल शिरसाठ हे आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी मेहरुण शिवारातील जुना टि.बी हॉस्पीटल जागेवर नवसमाज निर्माण बहुउदेशिय संस्थामार्फत चालविण्यात येणा-या श्वानांचे अँनीमल बर्थ कंट्रोल युनिट येथे भेट देवून चौकशी केली.
चौकशी दरम्यान अँनीमल बर्थ कंट्रोल युनिटमधील बरेच पिंजरे हे तुटलेल्या अवस्थेत आढळले असून ते श्वानांना ठेवण्यास अयोग्य आहे. तसेच पिंजरे ज्या खोल्यांमध्ये ठेवले आहे त्या खोल्यांना व्हेन्टीलेशन उपलब्ध नाही. प्रत्यक्ष चौकशी दरम्यान श्र्वानांना पुर्ण वेळ पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याचे दिसून आले. अँनीमल बर्थ कंट्रोल रुल्स २०२३ नुसार ऑपरेशन थेटरमध्ये नमूद सुविधा पुरेशा नाहीत. रेकॉडची तपासणी केली असता दि.२ व १० फेब्रुवारी रोजी ऑपरेशन झालेल्या श्वानांना किमान चार दिवस औषधोपचार करणे आवश्यक असतांना तिसऱ्या दिवशी सोडून दिल्याचे दिसले.
या सर्व त्रुटी आढळून आल्यामुळे प्रोजेक्ट डायरेक्टर गौतम अनिल शिरसाठ याचेविरुध्द जिल्हधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन यांचे आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सचिन पाटील करीत आहेत.