जळगाव ( प्रतिनिधी ) – शहराजवळच्या कुसुंबा गावातील एका २० वर्षीय तरुणाने घरातच छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतल्याची घटना आज दुपारी घडली .
प्रमोद रवींद्र खैरनार ( वय २० ) असे या तरुणाचे नाव आहे . आई वडील आणि भाऊ बाहेर गेल्यावर घरात कुणीही नसताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले . त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र लगेच समजू शकले नाही . त्याचा धाकटा भाऊ अमोल खैरनार घरी आल्यावर त्याच्या लक्षात ही घटना आली आणि त्याने छतावरून काढून त्याला ग्रामस्थांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले . तेथे सीएमओ डॉ स्वप्नील कळसकर यांनी त्याला मयत घोषित केले . दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान त्याने आत्महत्या केली असावी असे सांगण्यात आले .
प्रमोदचे आई -वडील रवींद्र खैरनार हे मजुरी करतात . त्याच्या पश्चात आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे . २ वर्षांपासून प्रमोद कुसूंबा गावात केशकर्तनालयाचे दुकान चालवत होता . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आलेल्या माहितीनुसार एम आय डी सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.