जळगावात गुंडाचा धुडगूस, पोलिसांकडून संशयिताला अटक
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रेल्वेस्थानक परिसरात कुऱ्हाडीच्या धाकावर दोन दुकाने लुटल्याची घटना घडली. त्याच दुकानदारांच्या घरावर गुंडाने धिंगाणा घातला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अजीज खान ऊर्फ बाबा याच्याविरुद्ध दोन स्वतंत्र लुटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकाबाहेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाजवळील दोन दुकानदारांना कुऱ्हाडीचा धाक दाखवीत गल्ल्यातील दोन हजार ३०० रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना शनिवारी दि.२१ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास समोर आली.
शिवाजीनगर परिसरात सैय्यद ऐहसान सैय्यद हैदर (वय ३०) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. रेल्वेस्थानकाजवळ चहाविक्री करून ते कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी दि. २१ रात्री साडेनऊला सैय्यद ऐहसान हे आपल्या दुकानावर चहा विकत असताना संशयित अजीज खान उर्फ बाबा (रा. गेंदालाल मील, जळगाव) हा इन्व्होवा कार (क्रमांक एमएच १९ बीजे १२२१) घेऊन रेल्वेस्थानकावर आला. त्याने हातात कुऱ्हाड घेऊन सैय्यद ऐहसानला धमकावत गल्ल्यातील १,५०० रुपये काढून घेतले.
त्यानंतर शेजारील दुकानातील राहुल सुनील खर्चाने यालाही कुऱ्हाडीचा धाक दाखवीत धमकी देवून त्याच्या गल्ल्यातील ८०० रूपये असे एकूण दोन हजार ३०० रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. याप्रकरणी सैय्यद ऐहसान सैय्यद हैदर यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून रविवारी मध्यरात्री एकला संशयित अजीज खान उर्फ बाबा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक अनिल भवारी करीत आहेत.