पाचोरा तालुक्यात ‘एसीबी’ ची धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना मंजूर करून देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात एक खाजगी पंटरला १० हजाराची लाच घेताना आज मंगळवारी दि. १९ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे घेतांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख हुसेन शेख बद्दू (वय ४०, रा. कुऱ्हाडदे बुद्रुक ता. पाचोरा) असे या लाचखोर पंटरचे नाव आहे. ३६ वर्षीय तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत तक्रार केली होती. पंतप्रधान घरकुल आवास योजनेसाठी त्याने ग्रामपंचायतीत अर्ज केला होता. सदर कामी मंजूर करून आणून देण्याकरिता संशयित शेख हुसेन शेख हुसेन याने १० हजार रुपयांची लाच मागितली होती. हि लाच स्वीकारताना मंगळवारी दि. १९ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे घेतांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेत अटक केली आहे.
सदरचा इसम हा कायम ग्रामपंचायतमध्ये राहून गावातील लोकांना वेगवेगळ्या भूलथापा देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन जागा नावे लावणे, उताऱ्यावर नावे लावणे, फेरफार नोंदी करणे, शासनाकडून देण्यात येणाऱ्या घरकुल, वैयक्तिक शौचालय व इतर योजना मिळवून देण्यासाठी पैसे घेऊन काम करत होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सदर कारवाई हि पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, पो.नि. अमोल वालझाडे, पोनि एन. एन. जाधव, सफौ दिनेशसिंग पाटील , पो.ना. बाळू मराठे, पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर ,पो.ना.किशोर महाजन, पोकॉ प्रदिप पोळ, पोना सुनिल वानखेडे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पोकॉ राकेश दुसाने आदींनी कारवाई केली आहे.