मन्यारखेडा शिवारातील घटना ; नशिराबाद पोलिसांची कारवाई
नशिराबाद ( प्रतिनिधी ) – जळगाव महामार्गालगत टीव्ही टॉवरसमोरील मन्यारखेडा शिवारातील एका पक्क्या सिमेंट काँक्रीटच्या घरात सुरू असलेल्या अवैध देहव्यापाराच्या अड्ड्यावर नशिराबाद पोलिसांनी बुधवारी (दि. ५ नोव्हेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी पाच तरुणींची सुटका करत दोन संशयितांना अटक केली असून, घटनास्थळावरून सुमारे ६३ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संबंधित ठिकाणी काही महिला आणि तरुणींना डांबून ठेवून जबरदस्तीने देहव्यापार करवून घेतला जात असल्याची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी तत्काळ कारवाईची योजना आखली. जळगाव मानवी तस्करी विरोधी पथकाच्या (AHTU) मदतीने या ठिकाणी छापा टाकण्यात आला. छापादरम्यान घरातून पाच तरुणी आणि दोन चालक आढळून आले, तर दोन प्रमुख संशयितांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी राहुल पाटील (रा. जळगाव) आणि राम बोरसे (रा. जळगाव) या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, चेतन माळी आणि श्याम बोरसे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी महिलांची सुटका करून त्यांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवले.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र तायडे, सहाय्यक फौजदार संजय महाजन, हवालदार शरद भालेराव, चंद्रकांत पाटील, गणेश गायकवाड, सागर भिडे, मोनाली दहीभाते, युगंधरा नारखेडे, भूषण पाटील, युनूस शेख, ज्ञानेश्वर पवार तसेच AHTU पथकाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली.









