जामनेर तालुक्यात शोककळा, बुलडाणा जिल्ह्यातील घटना
जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कुंभारी येथील बादल हवसू मंडाळे याने त्याची सासुरवाडी सिंदखेड लपाली येथे पत्नी व सासरच्या मंडळींशी वाद झाल्यानंतर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ८ सप्टेंबरला घडली. याबाबत धामणगाव बढे पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मयत बादल मंडाळे यांची पत्नी मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली येथील आहे. त्या गर्भवती असल्याने माहेरी गेलेल्या होत्या. दरम्यान, या महिलेने त्यांच्या पोटातील गर्भ पाडल्याची माहिती मिळताच, पत्नीला घेऊन येतो, असे घरच्यांना सांगून बादल हा सासुरवाडीला निघाला. मात्र, तेथे पोहोचल्यावर पत्नी आणि सासरच्या मंडळींसोबत बादल मंडाळे यांचा वाद झाला. याच वादामुळे बादल मंडाळे याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली, अशा आशयाची फिर्याद इंदुबाई चिंधू मुके (रा. कुंभारी) यांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून रुपाली बादल मंडाळे, संजय जयराम भंवर, लीलाबाई संजय भंवर, अक्षय संजय भंवर (सर्व रा. लपाली) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल वरारकर करत आहेत.