जळगावात १६ डिसेंबर रोजी होणार आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) :- विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे १६ डिसेंबर रोजी होणार्या कुमार साहित्य संमेलनाची निवड फेरी शुक्रवारी ८ डिसेंबर रोजी संपन्न झाली. खान्देशातील ४० शाळांमधून ७१० विद्यार्थी या निवड प्रक्रियेत सहभागी झाले होते. संमेलनाध्यक्ष म्हणून ए.टी.झांबरे विद्यालयाचा विद्यार्थी दामोदर चौधरी याची तज्ज्ञ परीक्षकांमार्फत निवड करण्यात आली. विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी पियुष बालाजीवाले याची स्वागताध्यक्ष तर पं.न. लुंकड कन्याशाळेची विद्यार्थीनी कु.संस्कृती पवनीकर हिची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
कथाकथन, काव्यवाचन, परिसंवाद, अभिवाचन या विविध साहित्य प्रकारात विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली. या निवड फेरीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्य साहित्य संमेलनात सादरीकरण होणार आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेले साहित्यिक व्यासपीठ म्हणून या साहित्य संमेलनाचा लौकीक आहे. निवड प्रक्रियेदरम्यान खान्देश बाल साहित्य मंडळाची समिती गठित करण्यात आली. संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रियेसाठी ३२ विद्यार्थ्यांनी मुलाखत दिली. यावर्षी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण झाल्यामुळे या संकल्पनेवर हे संमेलन आधारित असणार आहे. बालसाहित्यिकांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथील ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ लेखक व व्याख्याते प्रा.मोहन शेटे हे पुर्णवेळ उपस्थित राहणार असून त्यांची प्रतिभेच्या प्रांतातील प्रवास या शीर्षकाची प्रकट मुलाखत विद्यार्थी घेणार आहेत.
साहित्य संमेलनातील सादरीकरण गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञ परीक्षकांनी कथाकथन, काव्यवाचन, परिसंवाद, अभिवाचन या साहित्य प्रकाराचे परीक्षण करुन मुख्य संमेलनात सादरीकरण करणार्या बालसाहित्यिकांची निवड केली. यात डॉ.विद्या पाटील, पियुषभाई रावळ, अरविंद पाटील, शैलेजा पप्पू, दिपीका शिंपी, प्रसाद देसाई, हर्षल भांडारकर, प्रवीण नायसे, वैशाली पाटील या परीक्षकांनी परीक्षण केले. विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, सहसचिव विनोद पाटील, कविता दीक्षित, डॉ.वैजयंती पाध्ये उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख किरण सोहळे यांनी प्रास्ताविक केले. तर संमेलनप्रमुख भारती माळी यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी संमेलन समितीचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.