बेपत्ता झालेल्या जामनेरच्या तरुणाचा खून झाल्याचे उघड
जळगाव तालुक्यातील शिरसोली परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी ) – एकाच कंपनीत काम करणाऱ्या तिघा मित्रांमध्ये एकदा दुरावा आला. त्यात दोघांमध्ये कडाक्याची भांडण झाली. मात्र हे भांडण एकाने कायमचे डोक्यात ठेवले आणि संधी बघून दुसरेच निमित्त शोधत त्याला गावाकडे बोलवून गळा दाबून त्याचा खून केला. तसेच मृतदेह पोत्यामध्ये बांधून धरणामध्ये फेकून दिल्याचे जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपासामध्ये उघड झाले आहे. मयत तरुण हा जामनेर येथील असून ४ दिवसांपासून बेपत्ता झालेला होता. खुनाच्या घटनेमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.




जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर येथील रहिवासी निलेश राजेंद्र कासार (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो जामनेर शहरात आई, वडील, बहिण यांच्यासह राहत होता. सोमवार दि. १५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून निलेश कासार हा बेपत्ता झाल्याची माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आलेली होती. दरम्यान पोलीस तपासात समोर आले की, जळगाव शहरात एलटीआय फायनान्स कंपनीमध्ये तो काम करत होता.(केसीएन)याच फायनान्स कंपनीमध्ये दिनेश चौधरी (वय २०, रा. तळई ता.एरंडोल) हा कामाला आहे. तसेच भूषण बाळू पाटील (वय २० रा. पिंपरी ता. चोपडा) हे दोघेही आता जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे त्यांच्या मामाकडे कायमचे राहायला आलेले आहेत.

दरम्यान या तिघांमध्ये मैत्री निर्माण झालेली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून मयत निलेश कासार आणि भूषण बाळू पाटील यांच्यामध्ये वाद झाले होते. या वादातून झालेल्या भांडणामध्ये भूषण पाटील यानी मनात खुन्नस ठेवलेली होती.(केसीएन)दरम्यान भूषण पाटील याचे एलटीआय फायनान्स कंपनीमध्ये मित्राचे फायनन्सशी संबंधित प्रकरण होते.दिनेश चौधरीने ते प्रकरण निलेशकडे आहे असे सांगितले होते. मात्र ते प्रकरण निलेश कासार हा काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे होत नसल्याचे सांगत होता.

यापूर्वी झालेला वाद लक्षात ठेवून भूषण पाटील यानी निलेश कासारला शिरसोली येथे प्रकरण मंजुरीकरिता चर्चा करण्यासाठी बोलावले होते. त्या ठिकाणी तिघांची चर्चा फिस्कटली आणि शिरसोली गावात एका शेतात संशयित आरोपी भूषण पाटील आणि दिनेश चौधरी यांनी निलेश कासार याला दोरीने गळा आवळून त्याचा खून केला व त्याचा मृतदेह पोत्यात टाकून नेव्हरे धरणामध्ये फेकून दिला.
(केसीएन)दरम्यान बेपत्ता झाल्यामुळे पोलिसांसह नातेवाईक निलेशला शोधत होते. निलेशची दुचाकी मात्र रामदेववाडी गावालगत आढळून आली.
यामुळे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकाने निलेशचे मोबाईलचे कॉल डिटेल्स आणि इतर तांत्रिक बाबी शोधण्यास सुरुवात केली. यातून त्याच्या मित्र परिवाराचा शोध घेतला असता संशयित दिनेश चौधरी आणि भूषण पाटील यांना चौकशीसाठी बोलवले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी निलेशचा खून केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी “केसरीराज” ला दिली आहे. शुक्रवार दि. १९ रोजी सकाळी नेव्हरे धरणातून निलेश कासार याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे.
घटनास्थळावर पंचनामा करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल वाघ, स. फौ. विजयसिंग पाटील, अधिकार पाटील, समाधान ठाकरे, गिरीश पाटील, कैलास पाटील, मंदार पाटील, सुभाष साबळे, शिरसोली प्र.न. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी हे उपस्थित होते. एमआयडीसी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान जिल्ह्यात पुन्हा खुनाची घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली असून रुग्णालयात मयत निलेशच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे.








