आजी माजी आमदारांवर नेत्यांनी केले आरोप
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी आमदार दिलीप वाघ यांचे महाविकास आघाडी पॅनल, आमदारांचे शेतकरी विकास पॅनल यांच्या मेळाव्यात भाजप पुरस्कृत शिंदे परिवारावर बाजार समितीच्या जागा विकत घेण्याची आरोप करण्यात आले होते. आजी-माजी आमदारांना प्रत्त्युत्तर देण्यासाठी दि.२४ सोमवार रोजी भडगावरोड वरील शिंदे शाळेच्या मैदानावर भाजप पुरस्कृत शेतकरी सहकारी पॅनलचा मेळावा खा. उन्मेष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी सभापती सतिष शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या प्रमुख मर्गदर्शनात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भडगाव तालुका चिटणीस सोमनाथ पाटील, रवींद्र पाटील, रमेश वाणी, कैलास पाटील, कांतीलाल जैन, रुपेश शिंदे आदीं सह दोन्ही तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांची मोठी उपस्थिती होती. प्रास्ताविकात भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी पॅनलचे ध्येय, उद्दिष्टे आणि रूपरेषा सांगितली.सर्व १८ उमेदवारांचा परिचय पस चे माजी सभापती बन्सीलाल पाटील यांनी करून दिला. कृउबास चे माजी सभापती सतिष शिंदे यांनी आजी-माजी आमदारांच्या आरोपांचे कागदोपत्री पुरावे देत खंडन केले. या उलट किशोर पाटील व दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात समितीत भ्रष्टाचाराची मालिका कशी सुरू होती याचे अनेक दाखले दिले .व बाजार समिती वाचविण्यासाठी पॅनल निवडून देण्याचे आवाहन केले.
अमोल शिंदे मनोगतात म्हणाले कि,आमदार किशोर पाटील मला प्रमुख प्रतिस्पर्धी मानत असल्याने माझ्यावर कोणताही अभ्यास न करता पूर्ण माहिती न घेता, पुरावे न देता जागा खरेदी केल्याचे आरोप करीत असतात.आजी – माजी आमदारांचे नेतृत्व असतांना त्यांनी नेमलेल्या सभापतींनी जागा विक्रीसाठी केलेले ठराव, आमदारांच्या जवळच्या मित्रांना विक्री केलेल्या जागेंचे, खरेदी-विक्री वर असलेल्या त्या-त्या काळातील सभापतींच्या सह्याचे पुरावे मेळाव्यात सादर केले. आजी -माजी आमदारांनी बाजार समितीचे कर्ज फेडण्यासाठी पाचोरा, भडगाव, कजगांव, नगरदेवळा, वरखेडी या सर्व समितीच्या जागा बँकेकडे गहाण ठेवल्या. हे दोन्ही लबाड लांडगे असल्याचा जाहीर आरोप केला.
अध्यक्षीय भाषणात खासदार उन्मेष पाटील यांनी सहकारात स्वाहाकार करणाऱ्यांचा हातात सत्ता गेली तर त्या संस्थेचा विकास होत नाही असे उदाहरणे दिली.