रावेर तालुक्यात पाल ते खिरोदा दरम्यान अपघात
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाल–खिरोदा दरम्यान असलेल्या बोरघाटात दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भरधाव क्रुझर वाहन उलटून एका प्रौढाचा मृत्यू झाला आहे. तर ११ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम करण्यात आले आहे.
भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे येथील नागरिक पालकडे येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन रस्त्याच्या कडेला घसरले आणि झाडांना धडकून उलटून हा अपघात झाला. क्रुझर (क्र.एमएच १९ सीएफ ३९२०) या वाहनाचा भीषण अपघात झाला. या घटनेत एकाचा मृत्यू तर ११ प्रवासी जखमी झाले. मार्गावरील जाणाऱ्या नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना बाहेर काढले. जखमींना प्राथमिक उपचारासाठी पाल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेत पद्माकर पाटील (वय ६२), गणेश चौधरी (वय ६४), गोपाळ कोळी (वय ७१) आणि चालक प्रशांत चौधरी (वय ४८) अशी जखमी झाले आहेत. मृत व्यक्तीचे नाव विजय राणे (वय ५५, रा. अंजनसोंडे) असे असून, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून रावेर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.