निवड झालेल्या गावातील कृषि ग्राहकांनी चालू वीज देयक भरण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) – विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेनुसार राज्यातील कृषीपंपाना दिवसा 8 तास किंवा रात्री 10 तास आठवड्यात चक्राकार पध्दतीने थ्री फेज वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. परंतु रात्रीच्या वेळेस कृषीपंपाना देण्यात येणा-या विद्युत पुरवठ्यामुळे येणा-या अडचणी तसेच शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सुचना विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेव्दारे उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारुन निर्माण होणारी विज कृषी वाहिनीव्दारे दिवसा देण्याचे निश्चित केले असल्याचे राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्राद्वारे कळविले आहे.
या योजनेव्दारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोंबर, 2020 पासून राज्यातील कमीत कमी 50 वीज वाहिन्यावरील अंदाजे 25 हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यात येणार असून या योजनेतंर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पाच कृषि वाहिन्यांची निवड झाली आहे. यात पारोळा तालुक्यातील मेहुतेहू, उंदिरखेडा, शेळावे, विचखेडा, शेवगे या उपकेंद्रातील वाहिन्यांना दिवसा विज उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही उर्जामंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.
राज्यातील कृषी पंपाच्या थकबाकीचा आकडा हा व्याज व दंडासहिता सुमारे 42 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. व कृषी पंपाच्या थकबाकीबाबतचे धोरण हे महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे. परंतु सध्याची महावितरणची आर्थिक परिस्थिती विचारात घेता वरील योजनेची अंमलबजावणी करते वेळेस त्या वीज वाहिन्यावरील कमीत कमी 80% कृषी ग्राहकांनी चालू वीजदेयके भरणे अपेक्षित असल्याचा उल्लेखही उर्जामंत्र्यांनी पालकमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.
जळगाव जिल्ह्यात सर्व आमदारांच्या सहकार्याने ही योजना यशस्वी करण्याकरीता आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यासाठी सतत पाठपुरावा सुरु आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील वीज वितरणासंबंधिच्या प्रलंबित कामांसाठी सर्व आमदारांच्या उपस्थितीत मंत्रालयात ऊर्जामंत्र्यांकडे स्वतंत्र बैठकही घेण्यात येणार आहे. निवड झालेल्या उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी शासकीय/खाजगी जागा उपलब्ध करुन देण्याकरीता सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर या योजनेतील जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील जास्तीत जास्त गावांचा समावेश होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील सर्व गावांचा सर्व्हे करुन याबाबतची माहिती तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील वीज वितरणासंबंधी घेण्यात आलेल्या दोन दिवसीय आढावा बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळणे सुरु व्हावे, याकरीता पारोळा तालुक्यातील मेहुतेहू, उंदिरखेडा, शेळावे, विचखेडा, शेवगे या उपकेंद्रातील वाहिन्यांवरील ग्राहकांनी चालू विज देयके भरुन सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.