जळगाव ( प्रतिनिधी ) – अन्न व औषध प्रशासन आणि अन्नधान्य व आडत व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती, येथे अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत परवाना/नोंदणी विशेष शिबिर घेण्यात आले.

या शिबिरात अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा मानके कायद्यातील तरतुदींबाबत मार्गदर्शन केले. प्रामुख्याने 1 ऑक्टोबरपासून विक्री बिलांवर अन्न सुरक्षा मानके कायद्यातंर्गत परवाना क्रमांक नमुद करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. अन्न धान्य घाउक विक्री, अडतदार, अन्न धान्य वितरक , अन्न पदार्थ साठवणुकीसाठी वापरले जाणारे गोदाम याकरीता परवाना / नोंदणी बंधनकारक असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी अन्न व्यावसायिकांच्या शंकांचे निराकरण करुन शिबिराच्या अनुषगांने परवाना नोंदणी ऑनलाईन पध्दतीव्दारे सुरू करण्यात आली.
या शिबिराचे आयोजन शशी बियाणी ( अध्यक्ष, अन्न धान्य व आडत व्यापारी संघटना ) , विष्णुकांत मणियार, विकास महाजन, सुनिल तापडीया, सचिव यांनी यशस्वीरित्या केले. अन्न व औषध प्रशासन यांचेतर्फे यो. कों. बेंडकुळे ( सहायक आयुक्त) , विवेक पाटील ( अन्न सुरक्षा अधिकारी) हे उपस्थित होते. शिबिराचा मोठ्या संख्येने आडत विक्रेते व अन्न धान्य विक्रेत्यांनी लाभ घेतला.







