जळगाव (प्रतिनिधी) : – राशी ६५९ या बियाण्यांची विक्री ठरलेल्या ८६४ रुपयांच्या किंमतीत न करता, १२०० रुपयांमध्ये विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकाला चांगलेच महागात पडले आहे. गेल्या आठवड्यात कृषी विभागाच्या पथकाकडून जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील कृषी विक्रेत्याला रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी आता कृषी विभागाने कृषी केंद्र चालकाविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हास्तरीय भरारी पथकाकडून गेल्या आठवड्यात जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील भुषण कृषी केंद्रावर धाड टाकली होती. या ठिकाणी ८६४ रुपयांच्या बियाण्याची विक्री १२०० रुपयांमध्ये होत असल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी बियाणे निरीक्षक तथा मोहीम अधिकारी विजय पवार यांच्या फिर्यादीवरुन मंगळवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सुशील विठ्ठल महाजन (रा.खर्ची, ता.एरंडोल) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कृषी विभागाकडून संबधिताचा कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याबाबत देखील प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.