जळगाव शहरातील मध्यवर्ती भागातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील प्रताप नगरात एका ई-स्पोर्ट्स साहित्याच्या दुकानात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानातून चोरट्यांनी बॅट, टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट यांसारखे सुमारे ७० हजार ८३४ रुपयांचे साहित्य तसेच एक इनव्हर्टर आणि बॅटरी चोरून नेली. ही चोरी शनिवारी दि. २६ रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहरुण परिसरातील अक्सा नगरात राहणारे अलीम शेख रफिक यांच्या मामेभाऊ आमीर शेख फारुख यांचे प्रताप नगरात ‘ई-स्पोर्ट’ नावाचे दुकान आहे. दि. २५ एप्रिलच्या रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून आमीर शेख घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता त्यांच्या बाजूच्या फॅशन डिझायनर दुकानात काम करणाऱ्या टेलर असलम शेख यांनी आमीर शेख यांना फोन करून त्यांच्या दुकानाचे कुलूप तुटलेले असल्याची माहिती दिली.
माहिती मिळताच आमीर शेख तातडीने दुकानावर पोहोचले. त्यांनी पाहिले की दुकानाच्या शटरचे दोन्ही कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडले होते. त्यांनी त्वरित अलीम शेख रफिक यांना या घटनेची माहिती दिली आणि दुकानावर बोलावले. पाहणी केल्यानंतर दुकानातून विक्रीसाठी ठेवलेले विविध क्रीडा साहित्य तसेच इनव्हर्टर व बॅटरी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. चोरीमुळे दुकान मालकाचे मोठे नुकसान झाले असून, अलीम शेख यांनी या संदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून, चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे.