जळगाव ( प्रतिनिधी ) – खान्देशातील विविध कोविड रुग्णालयांकडे ८ कोटी २६ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. महावितरणने पाठपुरावा करूनही या रुग्णालयांनी थकबाकी भरलेली नाही.
कोविडच्या संकटातही महावितरणने नागरिकांसह सर्व रुग्णालये व अत्यावश्यक सेवांना अखंडित वीजपुरवठा केला. यात कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. वीजपुरवठा खंडित होणार नाही याची महावितरणने पूर्णपणे काळजी घेतली. वीजपुरवठा खंडित न करता थकबाकी भरण्यासाठी संबंधित रुग्णालयांच्या प्रशासनाकडे महावितरण वारंवार पाठपुरावा करत आहे. मात्र रुग्णालयांनी बिलांची थकबाकी भरलेली नाही.
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील दोन वीजजोडण्यांची १ कोटी ६६ लाख ४२ हजार ६४० रुपये , जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे १० लाख ७५ हजार ८४८ रुपये , गोदावरी फाउंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे ४ कोटी ६६ लाख ३६ हजार २२३ रुपये ,. धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे ८३ लाख ८० हजार ८८७ रुपये , शिरपूर येथील शासकीय रुग्णालयाकडे १२ लाख ६७ हजार ७६ रुपये , नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे ६१ लाख ४३ हजार ३२४ रुपये वीजबिल थकीत आहे.
महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी रुग्णालयांच्या अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहून वीजबिलाची मागणी केली आहे. कोविड-१९ आपत्तीमुळे महावितरण कंपनीची आर्थिक स्थिती बिकट आहे थकबाकी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल या पत्रांच्या प्रती जळगाव, धुळे व नंदुरबारचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठवण्यात आल्या आहेत.