मुंदखेडा येथील घटनेने जामनेर तालुका हादरला
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुंदखेडा गावात घरगुती वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करत तिची निर्घृण हत्या केली. हि घटना आज गुरुवारी दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मृत महिलेचं नाव अनिता उर्फ मिनाबाई बाळु भिल (मोरे,वय ४०, रा. मुंदखेडा ता. जामनेर) असं आहे. ती गावात पती, २ मुले, २ मुली यांच्यासह राहत होती. पती बाळु विश्वनाथ भिल (वय ४५) हा हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन),दरम्यान, गुरुवारी दि. १८ रोजी अनिता हि घरकाम करीत होती. दुपारी पती बाळू भिल याने पत्नीशी जुन्या वाद उकरून काढला.यावेळी संतप्त झालेल्या पतीने धारदार चाकूने पत्नी अनितावर सपासप वार करून तिची हत्या केली. गंभीर जखमी अवस्थेत महिलेला तात्काळ जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं, मात्र उपचार सुरू होण्याआधीच तिचा मृत्यू झाला.
माहिती मिळताच जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार हे आपल्या कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. अवघ्या काही तासांतच संशयित आरोपी पती बाळु भिल याला ताब्यात घेऊन अटक केली. घटनेमुळे मुंदखेडा गावात खळबळ उडाली आहे. गावात शोककळा असून लहान मुले मातृप्रेमाला पोरकी झाली आहे. घटनेत जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून तपास निरीक्षक मुरलीधर कासार यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय पाटील करीत आहेत.