वकिलाची न्यायाधीशांसह पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
जळगाव (प्रतिनिधी) :- सायबर पोलीस स्टेशनला दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला एका पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्याने आपल्या स्वतःच्या मोबाईलवरुन बोलू देत असल्याचा प्रकार जिल्हा न्यायालयाच्या अवारात उघडकीस आला. हा प्रकार अॅड. अमोल पाटील यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी पोलीस अधीक्षक व न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे.
जिल्हा न्यायालयात वकील असलेल्या अमोल पाटील यांनी न्यायालयात केलेल्या तक्रारीनुसार, सायबर पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित मनिष किरीटभाई प्रजापती (वय २३, रा. अहमदाबाद, गुजरात) याला सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी दिगंबर थोरात यांनी बुधवारी न्यायालयात आणले होते. न्यायालयाच्या आवारात उभे असतांना थोरात यांनी स्वतःचा मोबाईल संशयिताला दिला. त्यावरुन तो संशयित कोणाशीतरी संवाद साधतांना अॅड. अमोल पाटील यांनी त्याचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून संशयित आरोपीला इतकी सुट देणे हे न्यायालयाचा अवमान करण्यासारखे आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अॅड. पाटील यांनी न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली आहे. असाच अर्ज त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांना दिला आहे.