आ. किशोर पाटलांच्या भूमिकेचा आघाडीला फटका ?
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार आणि चाळीसगाव विधानसभा प्रभारी किशोर पाटील यांच्या भूमिकेमुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये (शिंदे गट) मोठी अस्वस्थता पसरली आहे. आज आमदार किशोर पाटील हे ‘शहर विकास आघाडी’च्या वतीने एका सभेला संबोधित करण्यासाठी येत आहेत. मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळे शिंदे सेनेचे स्थानिक उमेदवार आणि निष्ठावान कार्यकर्ते कमालीचे गोंधळात पडले आहेत.
शिवसेनेच्याच उमेदवारांच्या विरोधात प्रचार?
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या प्रभागात आमदार किशोर पाटील यांची ही सभा होत आहे, त्याच ठिकाणी शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असे असतानाही आमदार पाटील हे ‘शहर विकास आघाडी’साठी प्रचार करणार असल्याने, शिंदे सेनेच्या उमेदवारांची मोठी गोंधळ उडाली आहे. कार्यकर्त्यांसमोर ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आमदार किशोर पाटील यांची भूमिका फक्त आ. मंगेश चव्हाण यांना विरोध करण्यापुरतीच मर्यादित असल्यामुळे, या ‘व्यक्ती द्वेषाच्या’ राजकारणाने चाळीसगावचे स्थानिक कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
चाळीसगाव नगर परिषदेत शिंदे गटाचे एकूण ६ उमेदवार उभे आहेत. मात्र, शिंदे सेनेचे नेते आमदार किशोर पाटील हे आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी येत नसून, केवळ आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधासाठी ‘शहर विकास आघाडी’च्या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. यामुळे शिंदे सेनेच्या उमेदवारांची चांगलीच गोची झाली असून, त्यांच्या प्रचाराला यामुळे फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही सभा आयोजित करण्यात आली आहे, त्या परिसरातील अनेक विकास कामे आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहेत. आता त्याच विकास कामांच्या ठिकाणावरून आमदार किशोर पाटील हे आ.मंगेश चव्हाण यांच्यावर काय टीका करणार, असा प्रश्नही शहरात उपस्थित केला जात आहे.
आमदार किशोर पाटील यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे या संदर्भात तक्रार करण्याची तयारी अनेक कार्यकर्त्यांनी सुरू केल्याची दबक्या आवाजात चर्चा शहरात सुरू आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या उबाठा गटाच्या माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर आमदार किशोर पाटील यांनी कठोर आरोप केले होते, त्याच माजी खासदार उन्मेष पाटलांच्या मांडीला मांडी लावून ते व्यासपीठावर बसणार का? असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे.
आज होत असलेल्या या सभेमुळे काय घडत ! हे पाहाणे गरजेचे आहे.









