शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरु आहे. आज १७ व्या दिवशी एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली असून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नितीन रामचंद्र सपकाळे (वय ३५, रा. अंजाळे ता. यावल) असे उपचारासाठी दाखल उपोषणकर्त्याचे नाव आहे. कोळी समाजाच्या मागण्यांबाबत जोवर शासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोवर उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा समाजबांधवांनी घेतला आहे. उपोषण सुरु झाल्यावर काही दिवसांनी प्रकृती खराब झाल्याने उपोषणस्थळीच त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.
आज उपोषणाच्या १७ व्या दिवशी नितीन सपकाळे या तरुणाची प्रकृती खालावली. त्याला दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु असून अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.