जळगाव शहराजवळची घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरालगतच्या कोल्हे हिल्स परिसरातील देवराम नगरात मध्यरात्री एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी जीवितहानी टळली असली, तरी या आगीत सुमारे ३५ ते ४० हजार रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.

देवराम नगर भागातील रहिवासी जितेंद्र गणपत लोखंडे यांच्या घराला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली. रात्री १२:४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तालुका पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल मिलिंद सपकाळे यांनी या घटनेची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला दिली.
खबर मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने पाण्याचा मारा करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या मोहिमेत वाहन चालक देविदास सुरवाडे
अग्निशमन जवान रोहिदास चौधरी, योगेश पाटील, ऋषभ सुरवाडे, विठ्ठल पाटील आणि शुभम सोनवणे या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
या आगीत लोखंडे यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू आणि संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ३५ ते ४० हजार रुपयांचे साहित्य या आगीत जळून खाक झाले आहे. सुदैवाने, अग्निशमन दलाने वेळीच आग विझवल्याने ती शेजारील घरांमध्ये पसरली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.









