चाळीसगाव (प्रतिनिधी) – कन्नडहून चाळीसगावकडे येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना तीन भामट्यांनी चाकूचा धाक दाखवत मारहाण करून १६ हजार ४०० रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना २८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता कन्नड घाटाखालील अभिनंदन हॉटेलसमोर घडली.
हतनूर (ता. कन्नड) येथील मंगेश बंडू आल्हाट हा आपल्या मित्रांसह चाळीसगावला येत असताना लघुशंकेसाठी त्यांनी दुचाकी रस्त्यालगत थांबवली. त्याचवेळी रिक्षातून उतरलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना दटावत पकडले. आल्हाटचा एक मित्र भीतीपोटी पळून गेला.
रिक्षातील एकाने निळ्या जॅकेटमधून चाकू दाखवत आल्हाटला पैसे मागितले. विरोध केल्याने त्याला मारहाण करून डाव्या हातावर जखमी केले आणि खिशातील ६,४०० रुपये काढून घेतले. तर दुसऱ्या भामट्याने निवृत्ती भडंग याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या खिशातून १० हजार रुपयांचा मोबाईल हिसकावला. आरडाओरड होताच तिघे आरोपी रिक्षासह फरार झाले.
या प्रकरणी मंगेश आल्हाट यांच्या फिर्यादीवरून तीन अनोळखी आरोपींवर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी स.पो.नि. नितीन पाटील यांनी भेट देऊन तपासाची माहिती घेतली असून पुढील तपास पो.उ.नि. प्रदीप शेवाळे करत आहेत.









