जिल्हाधिकारी यांचे आदेश ; कोट्यवधींचा महसूल बुडविल्याची तक्रार
जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशनने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचेकडे बायो डिझेल पंपविषयी तक्रार केली होती. तसेच अनधिकृत बायो डिझेल पंप आणि ट्रेडिंग यांच्या माध्यमातून शासनाचा महसूल बुडविला जात असल्याबाबत पालकमंत्र्यांकडे माहिती दिली होती. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना पंप तपासणीचे आदेश दिले होते. आज मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीही सर्व तहसीलदारांना सूचना देत बायोडिझेल पंपाची तपासणी करून कोठे गैरप्रकार सुरू आहेत का आणि आर्थिक व्यवहाराची तपासणी करावी याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
त्यामुळे आता बायो डिझेल पंप जिल्ह्यात किती बेकायदा आहे तसेच शासनाचा किती रुपयांचा महसूल बुडविला गेला आहे, याबाबतची माहिती भविष्यात उघड होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे बोगस बायो डिझेल पंप आणि ट्रेडिंग कंपन्यांचे धाबे दणाणले असून सर्व तहसीलदारांनी धडक कारवाई लवकरात लवकर करणे अपेक्षित असल्याचे असल्याची अपेक्षा जिल्हा पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशनने केली आहे. पेट्रोलियम व विस्फोटक नियमांचे उल्लंघन होऊन अवैधरित्या बायोडिझेल मिनरल हायड्रोकार्बन बायो ऑईल इंधन च्या नावाखाली राज्यात डिझेल सदृश्य इंधनाची विक्री आणि साठवण तसेच हे सर्व अनधिकृत बायोडिझेल पंप आणि ट्रेडिंग कंपन्यांच्या माध्यमातून सुरू होत असल्याची तक्रार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशनने केली होती. यातून सुमारे सात हजार कोटी शासकीय महसुलाची लुटमार होत असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते. तातडीनं याबाबतची चौकशी होऊन कारवाई करण्याबाबत पेट्रोल पंप असोसिएशनने पालकमंत्र्यांकडे विनंती केली होती.