कोलकाता वृत्तसंस्था ;- बुधवारी पश्चिम बंगालमध्ये आलेल्या महाचक्रीवादळ अम्फनने रौद्र रूप धारण केले असून आतापर्यंत ७२ जणांचा बळी घेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चक्रीवादळाला करोना विषाणूपेक्षाही भयानक म्हटले आहे. गुरूवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अम्फन चक्रीवदाळामुळे पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तसेच मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना दोन लाख ५० हजार रूपयांच्या मदतीची घोषणाही यावेळी त्यांनी केली. आतापर्यंत इतकं भयानक चक्रीवादळ मी कधीही पाहिलं नव्हते, असेही त्या म्हणाल्या. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार यामध्ये सर्वाधिक मृत्यू झाडे पडल्यामुळे झाला आहे. ओडिशामध्येही तीन लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही राज्यात बचाव कार्य सुरु आहे. तसेच बांगलादेशमध्ये या चक्रीवादळामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
अम्फन चक्रीवादळाने पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या वादळामुळे समुद्र किनारी भागांमध्ये वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला असून मोठं नुकसान झालं आहे. कोलकत्ताच्या अनेक भागामध्ये पाणी भरलं आहे. या वादळाचा फटका कोलकाता विमातळालाही बसला आहे. विमानतळाच्या चारही बाजूने पाणी भरलं आहे. विमानतळामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी भरलेलं आहे. विमानतळाची धावपट्टी आणि हँगर पाण्याखाली बुडाले आहेत. विमानतळाचा काही भाग तर पूर्ण पाण्याखाली गेला आहे.







