पाटणा – बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया भागात गंगा नदीत 100 प्रवाशांनी भरलेली बोट पलटी झाली. या बोटमध्ये लहान मुलं आणि महिलादेखील होते. या बोटीत काही दुचाकी आणि सायकलदेखील ठेवण्यात आल्या होत्या. बोट उलटल्यानंतर काही प्रवाशी पोहत किनाऱ्यावर पोहोचले. मात्र, बरेच जण अजूनही बेपत्ता आहेत .
या दुर्घटनेनंतर किनाऱ्यावरील नागरिकांनी तातडीने बचाव कार्याला सुरुवात केली. त्यानंतर प्रशासनदेखील घटनास्थळ दाखल झाले. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. मात्र, अद्यापही अनेक जण बेपत्ता आहे. बचाव कार्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. बोटीत प्रवास करणारे सर्वाधिक प्रवासी हे मजूर आहेत. बोट उलटल्यानंतर जे मजूर पोहत किनाऱ्यावर पोहोचले त्यांचापैकी काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
बोटीतून उडी मारुन जे पोहत सुरक्षितपणे किनाऱ्यावर दाखल झाले, त्यांनी या दुर्घटनेची सविस्तर माहिती दिली. गंगा नदीच्या किणाऱ्यावरील गावाचे गावकरी आपल्या शेतात मक्काची पेरणी करण्यासाठी जात होते. गंगा नदिच्या पलिकडे त्यांची शेती आहे. त्यामुळे गावातील जवळपास 100 ते 125 नागरिक एकत्र बोटीत बसले. ही बोट नदीत अर्ध्या वाटेवर आली तेव्हा अचानक वादळात फसली. किनाऱ्यावर उभे असलेले नागरिक बोटीची वाट पाहत होते. त्यांना दुर्घटना घडण्याची चाहूल लागताच त्यांनी तातडीन बचाव कार्याला सुरुवात केली