पाचोरा-भडगाव मतदारसंघ : वैशाली सूर्यवंशी, अमोल शिंदे, दिलीप वाघ, संजीव पाटील मैदानात
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार व विद्यमान आ. किशोर पाटील यांच्याविरोधात मातब्बर प्रतिस्पर्धी वाढले आहेत. मतदारसंघातील वैशाली सूर्यवंशी, अमोल शिंदे, दिलीप वाघ, संजीव पाटील मैदानात उतरणार असल्याने किशोर पाटील यांच्या विजयाची संधी कमी झाल्याची प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
शिवसेना शिंदे गटातर्फे काल यादी जाहीर झाली. त्यात पाचोरा-भडगाव मतदारसंघातून पुन्हा एकदा आ. किशोर पाटील यांना संधी मिळाली. जिल्ह्यात महाविकासआघाडीचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत.(केसीएन)मात्र शिवसेना ठाकरे गटातर्फे वैशाली सूर्यवंशी यांचे नाव निश्चित झाले असून त्यांनी शुक्रवारी आदित्य ठाकरे यांची सभादेखील घेतली आहे. दुसरीकडे भाजपाचे पदाधिकारी असलेले अमोल शिंदे हेदेखील इच्छुक असून मागील वर्षीप्रमाणे ते अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. तसेच, त्यांना भाजपचा छुपा पाठिंबा राहील असे बोलले जात आहे. यामुळे महायुतीत फाटाफूट होऊन भाजपचे कार्यकर्ते मात्र आता विभाजित होण्याची चिन्हे दिसून येत आहे.
दुसरीकडे डॉ. संजीव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पदाधिकारीदेखील इच्छुक आहेत. तेही अपक्ष उमेदवारी लढण्याच्या तयारीत असून त्यांनी रणशिंग फुंकले आहे. (केसीएन)याचा तोटा आ. किशोर पाटील यांना मोठ्या प्रमाणात होईल अशी माहिती राजकीय विश्लेषक देत आहेत. दुसरीकडे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तसेच, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप वाघ हेही समाजमाध्यमात जोरदार प्रचार करीत आहे. अपक्ष उमेदवारी दाखल करणार अशी माहिती दिलीप वाघ यांचे कार्यकर्ते देत आहेत. त्यामुळे महायुतीला मोठी डोकेदुखी झाली आहे. तर भडगाव येथील प्रताप हरी पाटील हेही इच्छुक आहेत. त्यांच्याकडेही हजारो मते खेचण्याची ताकद आहे.