सावंतवाडी पोलीस स्टेशन आणि जळगाव एलसीबीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू खून प्रकरणातील फरार दोन संशयित आरोपींना दोन महिन्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळून अटक करण्यात आली आहे. सावंतवाडी ते मालवण असा पाठलाग करून त्यांना पोलिसांनी पकडल्याची माहिती मिळाली आहे.
जळगाव शहरात कालिका माता मंदिर परिसरात हॉटेल भानू येथे दि. २३ मे २०२४ रोजी किशोर सोनवणे याची संशयित ११ आरोपींनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. (केसीएन)सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. या घटनेतील दोन संशयित आरोपी निलेश युवराज सपकाळे (वय ३५, रा. शनिपेठ, जळगाव) आणि अमोल छगन सोनवणे (कोळी ) (वय ३०, रा. श्रीराम नगर,जळगाव) हे फरार होते. सदर गुन्हा शनिपेठ पोलीस स्टेशनला दाखल होता. या गुन्ह्यात पोलिसांचा तपास सुरूच होता.
दरम्यान पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी फरार आरोपींना अटक करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके विविध गुन्ह्यांमधील फरार संशयीतांचे शोध घेऊन त्यांना अटक करत आहे.(केसीएन) त्यातच हॉटेल भानू येथे झालेल्या खून प्रकरणात संशयित आरोपी निलेश सपकाळे आणि अमोल सोनवणे (कोळी ) यांची माहिती पोलिसांनी काढली. दोघेही सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यांमध्ये आजगाव येथे ओळख लपवून राहत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. येथील पोलिसांनी आजगाव येथे जाऊन संशयित आरोपींची माहिती घेतली. दरम्यान पोलीस मागावर असल्याची माहिती मिळताच संशयित निलेश सपकाळे आणि अमोल सोनवणे (कोळी )हे मालवणच्या दिशेने ते दोघे क्रेटा गाडीने पळून जाण्याचा प्रयत्नात होते. (केसीएन)पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना मालवणच्या हद्दीत ताब्यात घेतले. यानंतर सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी जळगावच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी)ला माहिती दिली. दोन्ही संशयित आरोपी हे एलसीबी च्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांना जळगावला आणण्यात येत असून आज रविवारी दुपारपर्यंत येतील अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
सिंधुदुर्ग येथील पोलिसांच्या कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी त्यांचे कौतुक केले आहे.