जिल्हास्तरीय वारकरी पदाधिकारी मेळावा, संत पूजन सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न
जळगाव (प्रतिनीधी) : श्री गुरु मोठे बाबा वारकरी सेवा ट्रस्टतर्फे सुगोकी लॉन येथील भव्य सभागृहात जिल्हास्तरीय वारकरी पदाधिकारी मेळावा व संत पूजन सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. यावेळी जिल्ह्यातील कीर्तनकार मार्फत ट्रस्टच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या भावनिक आणि विनोदी शैलीत सर्व वारकऱ्यांची मने जिंकली. “मी आधी वारकरी आणि मग राजकारणी आहे. कीर्तनकारांची सेवा हीच माझी ऊर्जा आहे. जीवात जीव असेपर्यंत वारकऱ्यांच्या सेवेसाठी काम करणार आहे, असे ते म्हणाले.

कीर्तन हे समाज परिवर्तनाचं मंदिर आहे, आणि कीर्तनकार हे त्या मंदिराचे पुजारी आहेत. वारकऱ्यांचे कुटुंब संकटात असताना शासन आणि आम्ही वैयक्तिकरित्या त्यांच्या पाठीशी उभे आहोत. ट्रस्टच्या मागण्यांना प्रतिसाद देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, “दरवर्षीच्या मानधन योजनेत ३०० कलाकारांना सामावून घेण्यासाठी आणि त्यात १५० वारकरी कलावंतांना मानधन देण्यासाठी मी कॅबिनेटमध्ये ठोस मागणी करणार आहे. तसेच पाच तालुके मिळून तीन ठिकाणी भव्य आरोग्य शिबिरे आयोजित करू.” जिल्ह्यातील एक हजार वारकरी कीर्तनकारांचा विमा काढण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही ते म्हणले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टचे अध्यक्ष गोप्रेमी ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर यांनी केले. तर प्रस्ताविक ह.भ.प. प्रा. सी.एस. पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन ह.भ.प. सुशील महाराज यांनी मानले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष व प्रेमी ह भ प गजानन महाराज वरसाडेकर यांनी मागणी केली की, दरवर्षी मिळणाऱ्या १०० कलाकार मानधन योजनेत ३०० कलाकारांना मानधन द्यावे, त्यापैकी ५० टक्के मानधन वारकरी संप्रदायातील पात्र कलावंतांना द्यावे. वारकरी संप्रदायातील कुटुंबासाठी आरोग्य शिबिरे जिल्ह्यातील पाच तालुक्यांनुसार तीन ठिकाणी आयोजित करावीत. वारकऱ्यांचा अपघात विमा काढण्यात यावा. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वारकरी संप्रदायातील एकता, भक्ती, भावनिकता आणि संत परंपरेचा जागर. सभागृहात “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. ट्रस्टमार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना “आधुनिक श्रावण बाळ” म्हणून गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
आयोजनात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचा सिंहाचा वाटा राहिला. ते म्हणाले, घरातून मिळालेल्या संतसेवेच्या संस्कारांनुसार आम्ही संत पूजन असो वा गुरुकृपा सेवा – अशा प्रत्येक उपक्रमात सदैव सहभागी राहू. यांची होती उपस्थिती कार्यक्रमात ह.भ.प. गोविंद महाराज, रवींद्र हरणे महाराज, पांडुरंग महाराज आवरकर, प्रतिभा सोनवणे, समाधान भोजेकर महाराज यांच्यासह असंख्य वारकरी उपस्थित होते. सभागृह भक्तिरस, कीर्तनाचा जोश आणि गुलाबराव पाटील यांच्या थेट हृदयाला भिडणाऱ्या भाषणाने भारावले होते.









