श्री दत्त जयंतीनिमित्त शिव कॉलनीत शिवनेरी ग्रुपतर्फे किर्तन सोहळ्याला प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी) : तरुणाईने धावपळीच्या जीवनातदेखील देवांच्या, संतांच्या सानिध्यात राहिले पाहिजे. त्यामुळे आपले आध्यात्मिक व नैतिक उन्नयन होण्यास मदत होते. समाजात विविध क्षेत्रात काही ठिकाणी अधःपतन होताना आपल्याला दिसत आहे. मात्र तरी देखील आपल्या देव-देशाच्या सेवेसाठी आपण तत्पर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ह.भ.प. रविकिरण महाराज दोंडाईचाकर यांनी केले.

शहरात शिव कॉलनी परिसरात चांदणी चौकातील मैदानामध्ये शिवनेरी ग्रुप तथा पंकज पाटील मित्र परिवारातर्फे दत्त जयंतीनिमित्त हभप रविकिरण महाराज दोंडाईचाकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराजांनी त्यांच्या खास विनोदी आणि ओघवत्या खान्देशी शैलीत कीर्तन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. महाराजांनी आपल्या कीर्तनात विविध धार्मिक आणि अध्यात्मिक विषयांवर अत्यंत सोप्या भाषेत श्रोत्यांना मार्गदर्शन केले. रोजच्या जीवनातील उदाहरणे आणि खान्देशी भाषेतील सहज संवादामुळे, त्यांचे विचार थेट श्रोत्यांच्या मनाला भिडले.
यावेळी माजी महापौर सीमाताई भोळे, माजी नगरसेविका दीपमाला काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कीर्तनादरम्यान, महाराजांनी विनोदी पद्धतीने धार्मिक महत्त्व सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्याचबरोबर भक्तिमार्ग आणि नीतिमत्तेचे महत्त्वही सांगितले. तरुणाईने व्यसनाच्या आहारी न जाता आपल्या दैनंदिनी तून वेळ काढून अध्यात्मिक सेवा करावी असेही आवाहन ह.भ. प. रविकिरण महाराज यांनी केले. कार्यक्रमासाठी शिवनेरी ग्रुप व पंकज पाटील मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.









