यावल (प्रतिनिधी) ;- तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील एका वृद्धाने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एकनाथ पाटील (वय-८१) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील रहिवाशी एकनाथ पाटील (वय-८१) हे शेतात जावून येतो असे सांगून सोमवारी ७ जून रोजी सकाळी ११ वाजता घरातून बाहेर पडले. सायंकाळी उशीरापर्यंत ते घरी न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी ८ जून रोजी कासारखेडा शिवारातील रविंद्र पाटील यांच्या शेतातील विहिरीत त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली . यावल ग्रामीण रूग्णालयात शविविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.







